सुस्वागतम !!! MPSC Alert ह्या वेबसाईट वर आपले स्वागत आहे.

Mar 2, 2014

मराठी ला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत - प्रा. वामन केंद्रेनवी दिल्ली : ग्रामीण भागात विविध माध्यमांतून होत असलेल्या मराठी भाषेच्या भाषिक व्यवहारातून आणि नाटक, साहित्य आदींतून मराठी भाषा समृध्द होत आहे. तदवत प्रमाण भाषेचा आग्रह व तत्सम भाषिक वाद दूर सारून सर्वांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन राष्ट्रीय नाटय विद्यालयाचे संचालक प्रा. वामन केंद्रे यांनी गुरुवारी केले. 

महाराष्ट्र परिचय केंद्र व महाराष्ट्र सदनाच्यावतीने येथील महाराष्ट्र सदनात आयोजित “मराठी भाषा गौरव दिनाच्या” कार्यक्रमात ते बोलत होते. वरिष्ठ पत्रकार धर्मानंद कामत, महाराष्ट्र सदनाचे अपर निवासी आयुक्त प्रदीप कुमार, महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यावेळी व्यासपिठावर उपस्थित होते.

श्री. केंद्रे म्हणाले की, मराठीच्या अनेक पोट भाषा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात बोलल्या जातात. या ग्रामीण मराठी भाषेत संगीत आहे, तीला एक लय आहे, नाद आहे. या भाषेचे हे विविध चेहरे आणि वर्हा डी, घाटी, बानकोटी आदी भाषेत होणारी नाटय निर्मीती आणि साहित्य यामुळे मराठी भाषा समृध्द होत असल्याचे ते म्हणाले. नोकरी, शिक्षण आदींच्या माध्यमातून महाराष्ट्रा बाहेर देशातील विविध भागात आणि परदेशात वास्तव्य करीत असलेल्या मराठी भाषीकांनीही आपआपल्यापरीने मराठी भाषेच्या विकासासाठी प्रयत्न करावे असे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले. 

श्री. धर्मानंद कामत यांनी आपल्या भाषणात सूप्रसिध्द साहित्यिक वि.वा. शिरवाडकारांच्या साहित्यावर प्रकाश टाकला. मराठी भाषीक लोक नोकरी व्यवसायासाठी राज्याबाहेर असले तरी मराठी भाषेच्या सूत्राने त्यांची नाड या भाषेशी जुडून असल्याचे मत त्यांनी आपले अनुभव कथन करीत सांगितले. पत्रकरीतेत शब्दांची टांकसाळ बाळगणारे पत्रकार आणि वाचकांकडून त्यांना मिळणारी दाद यावरही त्यांनी प्रकाश टाकला. नुकताच ओरिया भाषेला मिळालेला अभिजा भाषेचा उल्लेख करत मराठी भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा मिळून देण्याकरिता सर्वंकश प्रयत्न होण्याच्या भावनाही त्यांनी यावेळी बोलवून दाखवल्या. 

यावेळी विविध प्रसार माध्यमांत कार्यरत असणारे मराठी पत्रकार, विविध कार्यालयात कार्यरत अधिकारी, महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तावीक उपसंचालक दयानंद कांबळे यांनी केले. जनसंपर्क अधिकारी प्रवीण टाके यांनी सूत्रसंचालन केले तर उपसंपादक रितेश भुयार यांनी आभार प्रदर्शन केले. 

No comments:

Post a Comment