डॉ. अब्दुल कलाम


डॉ. अब्दुल कलाम यांच्या व्यक्तिमत्त्वाचे एक वैशिष्ट्य असे की, त्यांच्यावर आजपर्यंत कोणीही एका शब्दानेही ट टीका केलेली नाही. खरे तर त्यांना अनेकदा अनेकांना दुखवावे लागले होते तरीही ते अजातशत्रू राहिले. त्यांना मिसाईल मॅन म्हटले जाते पण हे अभिधान मिळवणे हे काही सोपे काम नव्हते. भारताची काही क्षेपणास्त्रे पूर्णपणे भारतीय बनावटीची आहेत. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेचे संचालक म्हणून हे काम करून घेताना डॉ. कलाम यांना आपल्या सोबत काम करणार्‍या अनेक अधिकारी, तंत्रज्ञ आणि शास्त्रज्ञ यांच्यात समन्वय साधावा लागला होता. मिसाईलचे सुटे भाग अनेक देशी कंपन्यांकडून तयार करून घेतले होते. अशा एकूण हजारभर कंपन्यांशी समन्वय साधून त्यांच्याकडून काम करून घेणे हीही मोठी कसरतच होती पण तीही डॉ. कलाम यांनी केली.
संस्थेतले एक काम त्या दिवशी पूर्ण करणे गरजेचे होते. पण होण्याची शक्यता दिसत नव्हती. डॉ. कलाम यांनी आपल्या एक सहकार्‍याला ते काम करायला सांगितले. घरी परतायला कितीही वेळ झाला तरीही ते काम करूनच जा असा दबाव कलामांनी त्या सहकार्‍यावर आणला. तो सहकारी तसा नाराजच झाला. आपण आज आपल्या मुलांना संध्याकाळी बागेत नेण्याचे आश्‍वासन दिले आहे त्यासाठी घरी लवकर परतणे कसे जरूर आहे ही गोष्ट तो आपल्या साहेबांना म्हणजे कलाम साहेबांना परोपरीने सांगायला लागला. पण डॉ. कलाम यांनी त्याला बजावले. खरे तर दटावलेच. ‘आपले काम करणे महत्त्वाचे आहे. ड्यूटी फर्स्ट.’ तो मनातल्या मनात जळफळायला लागला. आपले साहेब अविवाहित आहेत. त्यांना काय कळणार आपले दु:ख ? अशीही भावना त्याच्या मनात येऊन गेली. पण करतो काय ? साहेबांचा आदेश मानणे आवश्यक होते.

त्या सहकारी आपल्या मुलांना विसरून कामाला लागला. उशिरापर्यंत थांबून त्याने काम केले. ते पूर्णही झाले. तो उशिराने घरी आला. आपली मुले आपली वाट पाहून हिरमुसली असतील या कल्पनेत तो आपल्या मुलांना सॉरी म्हणण्याच्या मूडमध्येच घरी आला होता पण घरी आल्यावर पाहिले तर मुले अजीबात नाराज नव्हती. ती उलट खुशीत होती. कारण त्यांच्या बाबा वेळेवर घरी आले नव्हते तरीही त्यांची बागेची सफर मजेत पार पडली होती. त्यांना डॉ. कलाम काकांनी बागेत नेले होते. कर्तव्य आणि आपल्या सहकार्‍यांच्या भावना यांचा असा सुरेख मेळ घालण्याची अशी कला डॉ. कलाम यांना अवगत होती.

सौजन्य- माझा पेपर 

Post a Comment

Previous Post Next Post